हुक्केरी शहराची ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवीच्या यात्रोत्सवाचा प्रारंभ अत्यंत वैभवशाली ‘होन्नाट’ सोहळ्याने झाला. लखलखत्या विद्युत रोषणाईत आणि भंडाऱ्याच्या उधळणीत देवीने रात्रभर भक्तांच्या भेटीला येत आशीर्वाद दिले. या विलोभनीय सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी हुक्केरीसह परिसरातून हजारो भाविकांनी गर्दी केली होती.


यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी रात्री ८ वाजल्यापासून भंडाऱ्याच्या उधळणीसह ‘होन्नाट’ विधीला सुरुवात झाली. यावेळी देवीने पारंपारिक हक्कदारांच्या घरी भेट देऊन ओटी भरून घेतली. सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे धगधगते निखारे (इंगळोबान) खांद्यावर घेऊन धावणारे तरुण, हे दृश्य अत्यंत थरारक आणि रोमांचक होते. भाविकांनी यावेळी भंडाऱ्याची मुक्तहस्त उधळण केल्याने संपूर्ण परिसर पिवळामय झाला होता.
यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हुक्केरी नगरपरिषदेने चोख व्यवस्था ठेवली होती. देवीच्या संचार मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता, पथदिवे आणि अन्य मूलभूत सुविधा प्रशासनाकडून पुरवण्यात आल्या होत्या. यात्रेदरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी विशेष खबरदारी घेतली होती.
रात्रभर चाललेल्या या सोहळ्यात देवीने राजेश कुलकर्णी, विनोद मुतालिक, राजू कोटबागी, रवींद्र नाईक, शिवरुद्रप्पा शेट्टी, चंद्रशेखर मलकई, चिदानंद बस्तवाडे, सिद्धगौडा पाटील, रुद्रगौडा पाटील, कल्लपंत कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, बसगौडा पाटील, शिवानंद मुदकन्नवर आणि भीमानंद मुदकन्नवर या हक्कदारांच्या घरी भेट दिली. यावेळी या कुटुंबांनी देवीला वाण अर्पण करून आशीर्वाद घेतले. रात्रभर चाललेल्या या विधींनंतर पहाटेच्या सुमारास श्री लक्ष्मी देवी रथात विराजमान झाली.


Recent Comments