Belagavi

कारमध्येच ‘बार’ थाटणाऱ्या तळीरामांना पोलिसांचा दणका

Share

बेळगाव शहरात आता रस्त्याच्या कडेला कार उभी करून ‘पार्टी’ करण्याचा बेत आखत असाल, तर सावधान! सार्वजनिक ठिकाणांनाच बार बनवणाऱ्यांविरुद्ध बेळगाव पोलिसांनी मोहीम उघडली आहे. खुद्द पोलीस आयुक्तांनी मैदानात उतरून मद्यपींना चांगलाच इंगा दाखवला आहे.

बेळगाव शहराच्या रस्त्यांच्या कडेला आणि मोकळ्या मैदानात कार उभी करून मद्यपान करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या एका आठवड्यात कार, शेते आणि सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर छापे टाकून पोलिसांनी २४ गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत एकूण ३६ जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

शहरात सुसज्ज बार आणि रेस्टॉरंट असतानाही, अनेक जण रस्त्याच्या कडेला कार उभी करून आतमध्ये मद्यपान करताना आढळले आहेत. यामुळे केवळ सार्वजनिक शांततेचा भंग होत नाही, तर मद्यपान करून वाहन चालवल्याने अपघातांचा धोकाही वाढला आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस आयुक्त भूषण बोरासे यांनी रात्रीच्या वेळी संशयास्पद कारची तपासणी करण्याचे कडक आदेश दिले आहेत.

प्रामुख्याने ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ प्रकरणांना आळा घालण्यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहराच्या विविध भागांत अचानक तपासणी केली जात असून, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करताना आढळल्यास वाहन जप्त करण्यासोबतच कडक शिक्षा दिली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे रस्त्याच्या कडेला पार्ट्या करणाऱ्या मद्यपींमध्ये आता चांगलीच धडकी भरली आहे.

Tags: