Dharwad

धारवाडमध्ये कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या जनावरांची सुटका

Share

धारवाड जवळील सुळ्ळ मार्गावर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी धाडसी कारवाई करत अवैधपणे कत्तलीसाठी नेले जाणारे २४ गोधन सुरक्षितपणे वाचवले आहे. बेळगाव पासिंगच्या आयशर ट्रकमधून या जनावरांची अत्यंत दाटीवाटीने आणि क्रूरपणे वाहतूक केली जात होती, मात्र कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हा तस्करीचा प्रयत्न फसला.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवळ्ळी रस्त्यावरून सुळ्ळ मार्गे धारवाडच्या दिशेने एक टाटा आयशर ट्रक संशयास्पद रितीने जात असल्याची खात्रीशीर माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. कार्यकर्त्यांनी तात्काळ या वाहनाचा पाठलाग सुरू केला आणि त्याच वेळी धारवाडच्या जिल्हा पोलीस अधीक्षक गुंजन आर्य यांना घटनेची माहिती दिली. पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार सापळा रचून बेळगाव नोंदणी क्रमांक असलेले हे वाहन अडवण्यात आले.

वाहन अडवून त्याची झडती घेतली असता, त्यामध्ये २४ जनावरे अत्यंत निर्दयीपणे कोंडलेली असल्याचे आढळून आले. या कारवाईनंतर धारवाड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी जनावरांसह वाहन ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अवैध जनावरांची वाहतूक आणि गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tags: