घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये झालेल्या भरघोस वाढीचा निषेध करण्यासाठी विजापूर शहरात काँग्रेस महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शने केली. शहरातील डॉ. आंबेडकर चौकात जमा झालेल्या महिलांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत वाढीव दर तातडीने मागे घेण्याची मागणी केली.


घरगुती सिलेंडरची किंमत सुमारे ११०० रुपयांच्या घरात पोहोचल्याने गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे जगणे कठीण झाले आहे, असा आरोप यावेळी महिला कार्यकर्त्यांनी केला. “गॅसचे दर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले तर सर्वसामान्यांनी उदरनिर्वाह कसा करायचा?” असा सवाल उपस्थित करत महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. वाढत्या महागाईमुळे गृहिणींचे आर्थिक नियोजन कोलमडले असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
आंदोलनादरम्यान महिलांनी भरचौकात लाकडाची चूल मांडून त्यावर स्वयंपाक केला आणि वाढत्या गॅस दरवाढीचा निषेध नोंदवला. जोपर्यंत केंद्र सरकार गॅस सिलेंडरचे दर कमी करत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा इशारा काँग्रेस महिला आघाडीने दिला आहे.


Recent Comments