BENGALURU

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळाने घेतली भेट

Share

बेंगळुरू येथील ऑस्ट्रेलियन कॉन्स्युलेट जनरल कार्यालयाच्या कॉन्सुल जनरल हिलरी मॅक गेची आणि उपकॉन्सुल हॅरियट यांच्या शिष्टमंडळाने आज राज्याच्या महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची विधानसौध येथे सदिच्छा भेट घेतली.

यावेळी दोन्ही देशांतील विविध विषयांवर आणि विशेषतः महिला कल्याणाच्या योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळाला कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘गृहलक्ष्मी’ आणि ‘शक्ती’ योजनांची माहिती दिली. या योजनांमुळे राज्यातील महिला कशा प्रकारे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत आहेत आणि त्यांना प्रवासासाठी मिळणाऱ्या मोफत सुविधेमुळे काय बदल झाले आहेत, याचे विश्लेषण मंत्र्यांनी केले. या चर्चेनंतर शिष्टमंडळाने मंत्र्यांना ऑस्ट्रेलियन कॉन्स्युलेट जनरल कार्यालयाला भेट देण्याचे निमंत्रण दिले.


मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यावेळी म्हणाल्या, कर्नाटक सरकार महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे. गृहलक्ष्मी आणि शक्ती सारख्या योजना केवळ घोषणा नसून त्या महिलांच्या आयुष्यात परिवर्तन घडवणारे क्रांतीकारक पाऊल आहेत. जागतिक स्तरावर या योजनांची दखल घेतली जात असल्याचे पाहून आनंद होत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Tags: