बैलहोंगल येथील ज्येष्ठ आयुर्वेद तज्ज्ञ आणि शतायुषी डॉक्टर सुशीलादेवी बसवण्णप्पा रामण्णावर यांचे आज निधन झाले. आयुष्यभर देहदानासाठी जनजागृती करणाऱ्या या मातेने स्वतःचे पार्थिव वैद्यकीय संशोधनासाठी दान करून मृत्यूतही सार्थकता मिळवली आहे.


बैलहोंगल येथील बसवनगरच्या रहिवासी आणि ‘डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्ट’च्या अध्यक्षा असलेल्या १०१ वर्षीय डॉ. सुशीलादेवी रामण्णावर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. बी. एस. रामण्णावर यांच्या त्या पत्नी होत. १८ वर्षांपूर्वी पतीचे देहदान करून नवा इतिहास रचणाऱ्या सुशीलादेवी यांनी आपल्या अंतिम इच्छेनुसार बेळगावच्या केएलई संस्थेच्या बी. एम. कंकणवाडी आयुर्वेद महाविद्यालयाला देहदान केले.

डॉ. सुशीलादेवी यांनी आपले सुपुत्र डॉ. महांतेश रामण्णावर यांच्या साथीने राज्यभर नेत्रदान, अवयवदान आणि देहदानाबाबत समाजात असलेल्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी मोठे कार्य केले होते. त्यांच्या निधनाबद्दल डॉ. प्रभाकर कोरे आणि आमदार महांतेश कौजलगी यांच्यासह मान्यवरांनी शोक व्यक्त केला. डॉ. सुशीलादेवी यांच्या पार्थिवाचे बैलहोंगल येथील ‘मुरू सावीर मठा’च्या श्रींच्या उपस्थितीत अंत्यदर्शन घेऊन अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत बी. एम. कंकणवाडी महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होऊन देहदान, अंगदान आणि रक्तदानाचे महत्त्व पटवून देत होते. काही काळ राणी चन्नम्मा चौकात पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

अंत्ययात्रेद्वारे पार्थिव बेळगावमधील शहापूर येथील केएलई कंकणवाडी आयुर्वेद महाविद्यालयात आणण्यात आले. येथे मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यानंतर धन्वंतरी मंत्राच्या घोषात महाविद्यालयाला संशोधनासाठी मृतदेह सुपूर्द करण्यात आला.

आईने समाजात देहदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ट्रस्टची स्थापना केली होती. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या इच्छेनुसार मी स्वतः त्यांच्या पार्थिवाचे विच्छेदन करून विद्यार्थ्यांना शिकवले होते, आता आईनेही तशीच इच्छा व्यक्त केल्याने तिचे पार्थिव सुपूर्द करण्यात आले आहे. तसेच आईने नेत्रदान आणि त्वचादान करून अनेकांना जीवनाची नवी दिशा दिली आहे, असे डॉ. महांतेश रामण्णावर यांनी म्हटले.
रामण्णावर कुटुंबाचे हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. मरणोत्तर देहदानाचे महत्त्व पटवून देण्याचे काम डॉ. महांतेश करत असून, त्यांचा हा वारसा इतर वैद्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल, अशी प्रतिक्रिया माजी महापौर विजय मोरे यांनी व्यक्त केली.
माझे आई-वडील दोघेही डॉक्टर होते आणि त्यांनी विज्ञानाप्रती ही निष्ठा जपली आहे. २००८ मध्ये वडिलांच्या पार्थिवाचे विच्छेदन करून जसे वैद्यकीय धडे दिले गेले, तसेच आईच्या पार्थिवाबाबतही व्हावे ही तिचीच इच्छा होती आणि ती पूर्ण करताना कुटुंबाने त्यांना पाठिंबा दिला आहे, असे सुशीलादेवी यांची कन्या विजयलक्ष्मी मंदवाडी यांनी सांगितले.
वडिलांच्या पार्थिवाचे विच्छेदन करून विद्यार्थ्यांना वैद्यकीय धडे देण्याचे काम डॉ. महांतेश यांनी यापूर्वी केले आहे. आता आईच्या अंतिम इच्छेनुसार संशोधनासाठी हे पार्थिव महाविद्यालयाकडे सोपवण्यात आले आहे.


Recent Comments