बेळगावमधील जुने भाजी मार्केट परिसरातील खड्ड्यांमुळे होणारा वाहनधारकांचा त्रास पाहून पीएसआय महांतेश मठपती आणि स्थानिक तरुणांनी स्वतः रस्ता दुरुस्ती केली आहे. प्रशासनाची वाट न पाहता पोलीस आणि तरुणांनी दाखवलेल्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जुने भाजी मार्केट आणि मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती. या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी ट्रॅफिक पीएसआय महांतेश मठपती यांच्याकडे तक्रार केली होती. सार्वाजनिकांच्या तक्रारीवर तातडीने प्रतिसाद देत पीएसआय मठपती यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि स्वतः दुरुस्तीचा निर्णय घेतला.
पीएसआय मठपती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक तरुण पंकज जाधव, अप्पू जाधव, अयाज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्र येत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले. माती आणि दगड टाकून हे खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीसाठी योग्य करण्यात आला. पोलीस आणि नागरिकांच्या या सहभागामुळे वाहतूक कोंडीची समस्याही दूर झाली असून, या अभिनव उपक्रमाचे शहरभर कौतुक होत आहे.


Recent Comments