महिला दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केल्याच्या निषेधार्थ बेळगावात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली.


बेळगाव शहर आणि ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आरटीओ चौकातील काँग्रेस भवनासमोर डोक्यावर रिकामे सिलेंडर घेऊन केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला.
भाजप प्रणित केंद्र सरकारने महिला दिनीच दरवाढीचा झटका देऊन गृहिणींचे बजेट कोलमडवून टाकले आहे. या दरवाढीमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून आगामी काळात जनताच सरकारला धडा शिकवेल. जोपर्यंत गॅसचे दर कमी होत नाहीत, तोपर्यंत महिला काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला आहे.
गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक आणि हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार जनतेच्या पोटावर पाय देण्याचे काम करत आहे. परदेशी नेत्यांच्या दबावाखाली येऊन पंतप्रधान मोदींनी देशावर ही परिस्थिती ओढवून आणली आहे, असा आरोप ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी यांनी केला.
या आंदोलनात महिला काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. देशात गॅस दरवाढीचा प्रश्न गंभीर असताना बेळगावातील हे आंदोलन केवळ काँग्रेस भवनापुरतेच मर्यादित राहिल्याने, त्यावरून आता उलटसुलट चर्चाही सुरू झाली आहे.


Recent Comments