State

बेळगावमधील महालक्ष्मी नगरच्या समस्यांबाबत विधान परिषदेत चर्चा

Share

बेळगावमधील बसवण कुडची येथील देवराज अर्स कॉलनीतील महालक्ष्मी नगरमध्ये मूलभूत सोयीसुविधांच्या अभावाबाबत विधान परिषदेत चर्चा झाली.

के.एच.बी. निर्मित ही वसाहत महानगरपालिकेकडे हस्तांतरित होऊनही नागरिकांना अद्याप योग्य सुविधा मिळत नसल्याचा आरोप सदस्य साबण्णा तळवार यांनी सभागृहात केला.

विधान परिषदेत बोलताना साबण्णा तळवार म्हणाले की, २०२० मध्ये के.एच.बी. ने ही वसाहत बांधून महानगरपालिकेकडे सुपूर्द केली. मात्र, हस्तांतरण होऊनही येथे रस्ते, पाणी आणि इतर मूलभूत सोयी नसल्यामुळे रहिवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

यावर उत्तर देताना नगरविकास मंत्री बी.एस. सुरेश यांनी स्पष्ट केले की, बसवण कुडची येथील ही वसाहत आता महानगरपालिकेच्या कार्यकक्षेत आहे. हस्तांतरणाच्या वेळी तेथे प्राथमिक सुविधा होत्या. सध्या येथील यू.जी.डी., रस्ते आणि वीज यांसारख्या कामांसाठी १००५ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. निधीच्या उपलब्धतेनुसार ही कामे मार्गी लावली जातील, असे त्यांनी सांगितले.

साबण्णा तळवार यांनी या कामासाठी १५ कोटींची मागणी केली असता, मंत्र्यांनी माहिती दिली की बेळगाव महानगरपालिकेला एकूण १७० कोटी रुपये देण्यात आले असून त्यातील १५ कोटी रुपये के.एच.बी. वसाहतीसाठी वापरले जातील. सचिवांसोबत चर्चा करून लवकरच ही कामे सुरू करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

Tags: