State

इ-खात्यासाठी लाचखोरीच्या आरोपावरून विधानसभेत खडाजंगी; डी.के. शिवकुमार यांनी आर. अशोक यांना दिले थेट आव्हान

Share

राज्यात सुरू असलेल्या ‘इ-खाते’ नोंदणी प्रक्रियेवरून आज विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. मालमत्ता नोंदणीसाठी लाच घेतली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी केला, तर ही व्यवस्था देशासाठी आदर्श असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी सर्व आरोप फेटाळून लावले.

इ-खात्याबाबत विधानसभेत बोलताना विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी गंभीर आरोप केला. स्वतःच्या मालमत्तेची नोंदणी स्वतःच्या नावावर करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेतल्याशिवाय कोणीही हे दस्तऐवज तयार करून देत नाही, असे आव्हान आर. अशोक यांनी दिले.

यावर उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी आर. अशोक यांचे बोलणे मध्येच थांबवत जोरदार प्रत्युत्तर दिले. आम्ही राबवलेली ही प्रक्रिया देशासाठी आदर्श असून केंद्र सरकारनेही या उपक्रमाचे कौतुक करून पुरस्कार दिला आहे, असे त्यांनी नमूद केले. मग आता येथे टीका करणे कितपत योग्य आहे, असा सवाल करत १० हजार रुपये मागणाऱ्यांची यादी सादर करा, असे आव्हान डी.के. शिवकुमार यांनी आर. अशोक यांना दिले. काही वेळा तांत्रिक अडचणींमुळे इ-खाते मिळण्यास विलंब झाला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या चर्चेदरम्यान आमदार सुनील कुमार आणि विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी अनेक लोक पैसे मागत असल्याचा दावा केला. डी.के. शिवकुमार हे विमानाने प्रवास करत असल्याने त्यांना जमिनीवरील वास्तव समजत नाही, असा टोला आर. अशोक यांनी लगावला.

Tags: