Bailahongala

राणी चन्नम्मा स्मारकाच्या दुर्लक्षावरून बैलहोंगल बंद यशस्वी

Share

राणी कित्तूर चन्नम्मा यांच्या स्मारकाकडे होणाऱ्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ विविध संघटनांनी पुकारलेल्या ‘बैलहोंगल बंद’ला शहरात मोठा प्रतिसाद मिळाला. स्थानिक आमदार आणि सरकारच्या धोरणाविरोधात कन्नड आणि शेतकरी संघटनांनी एकत्र येत भव्य निषेध मोर्चा काढला.

बैलहोंगल येथील कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या स्मारकाची देखभाल आणि विकासकामांबाबत प्रशासन उदासीन असल्याचा आरोप करत सोमवारी शहर पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. भाजप आणि जेडीएस नेत्यांसह विविध संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेतला. स्मारकातील बागेचे काम अपूर्ण असतानाही त्याचे घाईघाईत उद्घाटन करून जनतेच्या भावनांशी खेळ सुरू असल्याची टीका आंदोलकांनी केली. यावेळी शहरातून मोर्चा काढत सरकारच्या कारभाराचा निषेध करण्यात आला.

आंदोलनावेळी बोलताना भाजप नेते व्ही. आय. पाटील यांनी आमदारांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. “हा लढा केवळ विरोधासाठी नसून इतिहासाचा सन्मान राखण्यासाठी आहे. बागेच्या कामासाठी ५ कोटी रुपये खर्च झाल्याचा दावा केला जात असला तरी, प्रत्यक्ष काम केवळ १ कोटींचेच दिसत आहे,” असा आरोप व्ही. आय. पाटील यांनी केला. तसेच लोकप्रतिनिधींकडून जनतेला चुकीची उत्तरे दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

आंदोलकांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला २७ मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. तोपर्यंत साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला असून, राणी चन्नम्मा यांच्या स्मृतींना योग्य सन्मान मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याची प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केली.

Tags: