Kagawad

कागवाड आणि शेडबाळमध्ये ‘नंदी सेना’ रथयात्रेचे जंगी स्वागत

Share

बैलजोडीच्या सहाय्याने शेती करणाऱ्या जुन्या पद्धतीमुळे पूर्वी शेतजमीन सुपीक होती आणि लोक निरोगी होते. तोच काळ पुन्हा आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी नंदी सेनेच्या वतीने श्री क्षेत्र येडूर ते श्री क्षेत्र श्रीशैल अशी ‘नंदी सेना रथयात्रा’ आयोजित करण्यात आली आहे.

याबाबत मोहिमेचे प्रमुख सोमलिंग बिरादार यांनी माहिती देताना सांगितले कि, या ऐतिहासिक रथयात्रेत किमान ११ हजार बैलगाड्या ३ ते ११ किलोमीटरपर्यंत सोबत चालून श्रीशैल मल्लय्याला आपली भक्ती सेवा अर्पण करणार आहेत. १५ मार्च रोजी श्रीशैल येथे या यात्रेचा समारोप होणार असून, यावेळी १००८ गावांतील प्रतिनिधींचा ऐतिहासिक शेतकरी मेळावा पार पडणार आहे.

बसराज बिरादार यांनी माहिती देताना सांगितले की, कर्नाटकातील २० लाख जोडबैल शेतकऱ्यांना एकत्र करणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. जोडबैल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘बसव तत्वाचे मूळ’ मानून त्यांच्यासाठी अर्थसंकल्पात १०% तरतूद करावी आणि अशा शेतकऱ्यांना दरमहा ११,००० रुपये प्रोत्साहन भत्ता देणारा कायदा लागू करावा, अशी मागणी या माध्यमातून करण्यात येत आहे.

शुक्रवारी ही रथयात्रा कागवाड आणि शेडबाळ गावात पोहोचली. यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी आपल्या बैलगाड्यांसह मोठ्या उत्साहात यात्रेचे स्वागत केले. बैलगाडीमध्ये श्री सिद्धेश्वर स्वामीजींची प्रतिमा ठेवून आणि नंदी यात्रेच्या घोषणा देत शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सिद्धेश्वर स्वामीजींचे बंधू सोमलिंग अज्जा यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा पुढे मार्गस्थ होत आहे.

याप्रसंगी विवेक बिरादार, संजू मालगावे, प्रवीण चौगुले, अशोक चौगुले, संतोष सिंग, रणजित गायकवाड, रावसाहेब कमाने, बंडू बरवाडे, अनिल पवार यांच्यासह कागवाड व शेडबाळ परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: