Belagavi

‘इथे ओशाळला मृत्यू’ नाट्यप्रयोगातून मिळणारा नफा शैक्षणिक उपक्रमांसाठी : अंकुश केसरकर

Share

म.ए. युवा समितीच्या वतीने येत्या रविवारी लोकमान्य रंगमंदिर येथे ‘इथे ओशाळला मृत्यू’ या ऐतिहासिक नाटकाचे दोन प्रयोग होणार आहेत. या प्रयोगांमधून मिळणारा सर्व नफा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी वापरला जाणार असून, जास्तीत जास्त बेळगावकरांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने रविवारी १५ मार्च रोजी लोकमान्य रंगमंदिर येथे ‘इथे ओशाळला मृत्यू’ या लोकप्रिय नाटकाचे एकाच दिवशी दोन प्रयोग होणार आहेत. या दोन्ही नाट्यप्रयोगांतून मिळणारा नफा शैक्षणिक उपक्रमांसाठी उपयोगात आणला जाणार असल्याची माहिती युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेची माहिती तरुण पिढीपर्यंत पोहोचवणे आणि युवावर्गात राष्ट्रप्रेम जागृत करणे, या उद्देशाने वसंत कानेटकर लिखित आणि शिवगणेश प्रोडक्शन (सिंधुदुर्ग-मुंबई) निर्मित या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार १५ मार्च रोजी पहिला प्रयोग दुपारी ३ वाजता तर दुसरा प्रयोग सायंकाळी ७ वाजता होणार असल्याचे अंकुश केसरकर यांनी सांगितले.

या नाट्यप्रयोगाला प्रसाद मेडिकल मॉल आणि आर.एम. चौगुले असोसिएट्स प्रायोजक म्हणून लाभले आहेत. या माध्यमातून मिळणारा निधी युवा समितीच्या वतीने शैक्षणिक कार्यासाठी वापरला जाणार असल्याने बेळगावकरांनी देणगी प्रवेशिकेच्या माध्यमातून या प्रयोगाला उस्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन अंकुश केसरकर यांनी केले.

नाटकाच्या देणगी प्रवेशिका युवा समिती कार्यालय (टिळकवाडी), शिवाजी कुडुचकर ज्वेलर्स (खडेबाजार, शहापूर), डी.बी. पाटील फोटो स्टुडिओ, मसनाई ई-स्कूटर (शिवाजी नगर), गजानन वर्पे (मच्छे) आणि प्रसाद फार्मा (शनिवार खुट) येथे उपलब्ध असल्याचे सचिव श्रीकांत कदम यांनी सांगितले. यावेळी नाटकाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी प्रसाद फार्माचे संचालक सी.के. पाटील, सचिन केळवेकर, सुरज कुडुचकर, वासू सामजी आदी उपस्थित होते.

Tags: