Belagavi

येडूरमध्ये कन्नड माध्यम शाळा इमारतीचा भूमीपूजन सोहळा

Share

जागतिक स्तरावर विस्तारलेल्या केएलई संस्थेने सीमावर्ती भागात अनेक शाळांची निर्मिती करून मातृभाषेची निस्वार्थ सेवा केली आहे. आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात आपली भाषा टिकवून ती वृद्धिंगत करण्याचे संस्थेचे कार्य अद्वितीय असल्याचे प्रतिपादन काशी पीठाचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.

येडूर येथे केएलई कन्नड माध्यम शाळेच्या नवीन इमारतीचा भूमीपूजन समारंभ महास्वामीजींच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील संस्थेच्या कार्याचा गौरव केला. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्या दूरदृष्टीमुळे आणि कष्टांमुळेच ही संस्था आज समाजभिमुख होऊन विस्तारली आहे. येडूरच्या वीरभद्र स्वामींच्या सानिध्यात ही शाळा उभारणे हा कोरे यांच्या मातृभाषा प्रेमाचा पुरावा असून, या पवित्र कार्यासाठी पंचपीठाच्या जगद्गुरूंना निमंत्रित करणे हा ईश्वरी संकेत असल्याचे डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी म्हटले.

संस्थेच्या प्रत्येक कार्याला पंचपीठाच्या जगद्गुरूंचे नेहमीच पाठबळ लाभले आहे. त्यांच्याच शुभहस्ते आज या शाळेचे भूमीपूजन झाल्याचा मोठा आनंद असून, आगामी काळात येथे सर्व सोयींनी युक्त अशी दर्जेदार शाळा उभारली जाईल, अशी ग्वाही डॉ. प्रभाकर कोरे यांनी दिली.

या सोहळ्याला श्रीशैल पीठाचे जगद्गुरु चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी, उज्जैनी पीठाचे जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी आणि काशी महापीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी केएलई संचालक मंडळाचे महांतेश कवटगीमठ, जयानंद मुनव्वळी, बसवराज पाटील, विश्वनाथ पाटील, प्रवीण बागेवाडी, मंजुनाथ मुनव्वळी, विजय मेटगुड, माजी संचालक शंकराण्णा मुनव्वळी आणि आमदार गणेश हुक्केरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: