Belagavi

बेळगावच्या सुमन आजींची विशाखापट्टणममध्ये ऐतिहासिक कामगिरी

Share

वय ही केवळ संख्या असल्याचे सिद्ध करत बेळगावच्या शांताई वृद्धाश्रमातील सुमन आजींनी विशाखापट्टणम येथे केंद्र सरकारच्या वतीने आयोजित भव्य सायकलिंग स्पर्धेत विशेष अतिथी म्हणून सहभाग नोंदवला. या माध्यमातून त्यांनी बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

विशाखापट्टणम येथे केंद्र सरकारच्या ‘स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया’तर्फे आयोजित ‘क्विट इंडिया’ कार्यक्रमात बेळगावच्या शांताई वृद्धाश्रमातील सुमन आजी यांचा गौरव करण्यात आला. आजींचा उत्साह आणि तंदुरुस्ती पाहून केंद्र सरकारने त्यांना या उपक्रमासाठी ब्रँड अँबेसेडर म्हणून निमंत्रित केले होते, अशी माहिती माजी महापौर आणि आश्रमाचे प्रमुख विजय मोरे यांनी बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

सुमारे १० हजारांहून अधिक सायकलस्वार सहभागी झालेल्या या भव्य स्पर्धेला सुमन आजींनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. या कार्यक्रमात आश्रमाचे प्रतिनिधी म्हणून आलन मोरे आणि शरल मोरे देखील उपस्थित होते. वृद्धापकाळातही आजींची सक्रियता आणि आरोग्याची शिस्त पाहून त्यांना हा सर्वोच्च सन्मान देण्यात आला असून ही बेळगाव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे विजय मोरे यांनी सांगितले.

वृद्धाश्रमातील आजींची ब्रँड अँबेसेडर म्हणून एका वर्षासाठी निवड होणे ही अत्यंत गौरवाची गोष्ट आहे. विशाखापट्टणम येथील १० हजार सायकलस्वारांच्या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सुमन आजींच्या हस्ते झाले. गेल्या २७ वर्षांपासून शांताई वृद्धाश्रम कार्यरत असून आमच्या आश्रमात आजी-आजोबांना व्यायाम करणे अनिवार्य आहे, त्यांच्या आरोग्याकडे आम्ही विशेष लक्ष देतो, अशी प्रतिक्रिया विजय मोरे यांनी व्यक्त केली.

यावेळी राजू गवळी, संतोष ममदापूर, मारिया मोरे, शरल मोरे, अलेन मोरे, गंगाधर पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: