बेळगाव महानगरपालिकेकडून करण्यात आलेली ३ टक्के मालमत्ता कर वाढ नियमबाह्य असल्याचा आरोप करत, आज ज्येष्ठ नागरिक आणि माजी नगरसेवकांनी महापौरांची भेट घेतली. ही दरवाढ सर्वसामान्यांसाठी मोठा आर्थिक बोजा ठरणार असल्याने ती मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.


ज्येष्ठ नागरिकांनी आज महापौर मंगेश पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. यावेळी मालमत्ता कर वाढीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महानगरपालिकेने घेतलेला हा निर्णय लोकहिताचा नसल्याची भावना शिष्टमंडळाने व्यक्त केली.
महानगरपालिकेच्या मागील बैठकीत अशिस्तीचे प्रकार घडले असून सभेच्या अजेंड्यावर नसतानाही कर वाढीचा विषय अचानक मांडण्यात आला, असा आरोप माजी नगरसेवक नागेश सातेरी यांनी केला. ठराव मांडण्याचा अधिकार केवळ महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांना असताना कौन्सिल सेक्रेटींनी हा विषय कसा मांडला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरवर्षी होणारी ३ टक्के कर वाढ जनतेवर अन्यायकारक असून पालिकेने प्रशासकीय अधिकारांचा गैरवापर थांबवावा, असेही नागेश सातेरी यांनी म्हटले.
यावेळी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, निवृत्त शासकीय कर्मचारी अमरोळकर, दीपक सावंत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. लोकअदालतीतील जन्म-मृत्यू दाखल्यांचे आदेश ग्राह्य धरण्यात यावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.


Recent Comments