Belagavi

मारीहाळ पोलिसांच्या कारवाईत आंतरराज्य वाहन चोरांच्या टोळीचा पर्दाफाश

Share

मारीहाळ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या वाहन चोरीच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंतरराज्य वाहन चोरांच्या टोळीला बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून ९५ लाख ५० हजार रुपये किमतीची एकूण २१ वाहने जप्त केली आहेत.

शहर पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मारीहाळ हद्दीतील निलजी क्रॉस येथून २७ नोव्हेंबर रोजी अशोक लेलँड ट्रक चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असताना पोलिसांनी या टोळीचा पर्दापाश केला आहे. शिवमोगा, भद्रावती आणि सांगली येथील हे चोर रात्रीच्या वेळी विविध शहरांत फिरून प्रथम रॉयल एनफिल्ड किंवा सुझुकी ॲक्सेस सारख्या दुचाकी चोरत असत. त्यानंतर त्याच दुचाकींचा वापर करून उभी असलेली अशोक लेलँड मिनी ट्रक चोरून त्यांची विक्री करत असत. या प्रकरणी युसूफखान सिकंदर खान (धारवाड), झाकीर हुसेन परदेवाले (धारवाड), आझाद मुतवल्ली (विजापूर), शफीक अहमद (वेल्लोर, तामिळनाडू) आणि बशीर अहमद मकानदार (दांडेली) या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी जप्त केलेल्या २१ वाहनांमध्ये ८ अशोक लेलँड ट्रक, ५ रॉयल एनफिल्ड बुलेट, ५ सुझुकी ॲक्सेस आणि ३ इतर दुचाकींचा समावेश आहे. विशेष म्हणजे चोरलेल्या या गाड्या महाराष्ट्रातील सांगली (संजयनगर), कोल्हापूर (शिरोळ), पुणे यांसह बेंगळुरू, नेलमंगला, यशवंतपूर, दावणगेरे आणि तुमकूर येथील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

बेळगाव ग्रामीण उपविभागाचे एसीपी गंगाधर बी. एम. यांच्या मार्गदर्शनाखाली मारीहाळचे पोलीस निरीक्षक आय. आर. पट्टणशेट्टी, पीएसआय मंजुनाथ हुलकुंद, चंद्रशेखर सी., मंजुनाथ भजंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही धाडसी कारवाई केली. या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांनी संपूर्ण पथकाचे विशेष कौतुक केले आहे.

Tags: