जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ७ मार्च रोजी बेळगावातील शिवबसवनगर येथील एस.जी. बाळेकुंद्री तांत्रिक महाविद्यालयात भव्य जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी या मेळाव्यात सहभागी होऊन रोजगाराची संधी मिळवावी, असे आवाहन जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी केले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणाऱ्या या मेळाव्याचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी तसेच महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ असणार आहेत, तर वैद्यकीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या रोजगार मेळाव्यात बेळगाव, हुबळी आणि बेंगळुरू येथील १०० हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. जिल्ह्यातील सुशिक्षित तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राहुल शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.


Recent Comments