कडक पोलीस बंदोबस्त आणि कर्तव्याच्या व्यापातून वेळ काढत बागलकोटचे पोलीस अधीक्षक सिद्धार्थ गोयल यांनी श्रीशैल मल्लिकार्जुन देवाच्या दर्शनासाठी निघालेल्या पदयात्रींची सेवा करून नवा आदर्श घालून दिला आहे.


बागलकोटचे पोलीस अधीक्षक सिद्धार्थ गोयल यांनी आपल्या व्यस्त कामकाजातून वेळ काढून एक विशेष धार्मिक आणि मानवी सेवा केली आहे. महाशिवरात्रीनिमित्त बागलकोट शहरातून आंध्र प्रदेशातील श्रीशैल क्षेत्राकडे पदयात्रेने निघालेल्या हजारो भक्तांना सिद्धार्थ गोयल आणि त्यांच्या पत्नीने स्वतः ताक, केळी आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. रणरणत्या उन्हात मैलोन्मैल चालणाऱ्या पदयात्रींचा थकवा दूर करण्यासाठी हे दांपत्य रस्त्यावर उतरले आणि त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन ही सेवा बजावली, ज्याचे सार्वजनिक स्तरावर मोठे कौतुक होत आहे.
पदयात्रींच्या प्रकृतीची विचारपूस करत सिद्धार्थ गोयल यांनी भक्तांना धीर दिला. एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने कोणताही डामडौल न ठेवता पत्नीसह अशा प्रकारे भक्तांची सेवा केल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. सोशल मीडियावरही या सेवाकार्याचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, पोलिसांच्या या जनस्नेही कार्याची जिल्हाभर चर्चा सुरू आहे.


Recent Comments