बेळगावमधील सुभाष नगर परिसरात एल अँड टी कंपनीचा सावळा गोंधळ सुरू असून सांडपाणी वाहिनीच्या कामासाठी खोदलेल्या रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. रस्ते आणि पाणी अशा दोन्ही समस्यांमुळे रहिवाशांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.

बेळगाव महापालिकेच्या पाठीमागेच असलेल्या सुभाष नगरमध्ये एल अँड टी कंपनीच्या कामाबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या आठ दिवसांपासून सांडपाणी वाहिनी टाकण्यासाठी रस्ते खोदून ठेवले आहेत, मात्र हे काम अद्याप पूर्ण करण्यात आलेले नाही. रस्ते खोदताना पिण्याच्या पाण्याची वाहिनी फुटल्याने गेल्या आठवड्यापासून संपूर्ण वसाहतीचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच थेंब थेंब पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.
रस्त्यांच्या मधोमध खोदलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वृद्ध, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना चालणेही कठीण झाले आहे. सध्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा सुरू असून, या धोकादायक रस्त्यांवर अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल स्थानिक रहिवासी विचारत आहेत.
संबंधित एल अँड टी अधिकारी आणि महापालिका कर्मचाऱ्यांना वारंवार संपर्क करूनही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. हे काम तातडीने पूर्ण करून रस्ते पूर्ववत करावेत, अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुभाष नगरच्या रहिवाशांनी दिला आहे.


Recent Comments