बेळगाव महानगरपालिकेचे महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या सामान्य सभेत जन्म आणि मृत्यू दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना होणाऱ्या त्रासावर गंभीर चर्चा झाली. एजंटांचा सुळसुळाट आणि तांत्रिक त्रुटींमुळे सर्वसामान्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याकडे आमदार आणि नगरसेवकांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

आज बेळगाव महानगरपालिकेत महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी जन्म आणि मृत्यू दाखल्यांच्या कामात वाढलेली मध्यस्थांची लुडबूड थांबवण्याचे निर्देश दिले, अशी प्रतिक्रिया आसिफ सेठ यांनी व्यक्त केली.
सत्ताधारी गटनेते हनुमंत कोंगाली आणि आमदार अभय पाटील यांनी दाखले वितरणासाठी स्वीकारल्या जाणाऱ्या कागदपत्रांच्या माहितीची विचारणा केली. तसेच केवळ कायदेशीर कागದपत्रेच स्वीकारून प्रक्रिया राबवण्याची सूचना अभय पाटील यांनी मांडली.
नगरसेवक रवी साळुंके यांनी जन्म-मृत्यू दाखल्यासाठी ७० रुपये शुल्क घेतले जात असून जुने संगणक आणि कालबाह्य सॉफ्टवेअरमुळे कामे रखडत असल्याचे सांगितले. ही यंत्रणा बदलून कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची आग्रही मागणी रवी साळुंके यांनी केली.
यावर स्पष्टीकरण देताना महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी सांगितले की, अर्ज स्वीकारल्यानंतर आता दाखले टपाल सेवेद्वारे थेट नागरिकांच्या घरपोच पाठवले जात आहेत. भविष्यात लोकांची गैरसोय टाळण्यासाठी सेवांमध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन कार्तिक एम. यांनी दिले.


Recent Comments