होळी सणानिमित्त धारवाडमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपारिक हलगी उत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. होसयल्लापूर येथील वीरभद्रेश्वर मंदिरातून या मिरवणुकीला प्रारंभ झाला असून शेकडो तरुणांनी हलगीच्या तालावर ठेका धरत शहरात चैतन्य निर्माण केले.


धारवाडमधील होसयल्लापूर येथील कामनकट्टी श्री वीरभद्रेश्वर मंदिर परिसरात विशेष पूजा आणि महाआरती पार पडली. त्यानंतर माजी आमदार अमृत देसाई आणि सीमा मसूती यांच्या हस्ते या उत्सवाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. हलगीच्या निनादात उत्सवाला सुरुवात होताच तरुणांनी ढोल-ताशांच्या गजरात होळीचा आनंद द्विगुणित केला. पारंपारिक वेशभूषा केलेल्या कलाकारांनी सादर केलेली प्रात्यक्षिके नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली. शहरातील मुख्य रस्त्यावरून निघालेल्या या मिरवणुकीत महिला, तरुण आणि बालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. हलगीच्या कडकडाटाने धारवाडची सांस्कृतिक आणि भक्तीमय परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली. या कार्यक्रमाला माजी आमदार अमृत देसाई, सीमा मसूती, महापौर ज्योती पाटील, महापालिका सदस्य इरेश अंचटगेरी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

हिंदू युवा समुदायाचा सण म्हणून होळीची मोठी ख्याती असून या सणाला हलगी परंपरेची विशेष जोड लाभली आहे. हलगी उत्सवाच्या माध्यमातून ही परंपरा जतन करून संघटितपणे पुढे नेण्याचे काम कौतुकास्पद असल्याचे मत अमृत देसाई यांनी व्यक्त केले.



Recent Comments