Belagavi

बेळगावात ५ मार्चला सहकार क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसाठी विशेष कार्यशाळा

Share

सहकार क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी कर्नाटक राज्य सहकारी पतसंस्था महामंडळाच्या पुढाकारातून बेळगाव विभागातील पाच जिल्ह्यांतील पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांसाठी ५ मार्च रोजी बेळगावात विशेष शैक्षणिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबत महामंडळाचे संचालक डॉ. संजय होसमठ यांनी बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. कर्नाटक राज्य सहकारी पतसंस्था महामंडळातर्फे बेळगाव, धारवाड, कारवार, गदग आणि हावेरी या पाच जिल्ह्यांतील पतसंस्थांचे अध्यक्ष व संचालकांसाठी ही एकदिवसीय शैक्षणिक कार्यशाळा घेण्यात येणार आहे. ५ मार्च रोजी सकाळी ९ वाजता बेळगावमधील महांतेशनगर येथील ‘महांत भवन’ मध्ये हा कार्यक्रम संपन्न होईल.

बेळगाव डीसीसी बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार असून पतसंस्था महामंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या कार्यशाळेत प्रामुख्याने सहकारी पतसंस्थांच्या भविष्यासाठी विमा योजना, विविध कार्यपद्धती आणि सहकार क्षेत्रातील कायदे व नियमांबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल, असे डॉ. संजय होसमठ यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला सहकार विभागाचे सहनिबंधक कल्लाप्पा ओबळ्ळोळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सहकार क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरणार असून संबंधित पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. संजय होसमठ यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला उमेश बाळी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: