Vijayapura

चंद्रग्रहणानिमित्त शिवगिरी मंदिरात धार्मिक विधींचे आयोजन

Share

२०२६ मधील पहिले चंद्रग्रहण ३ मार्च रोजी होळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर येत आहे. या पार्श्वभूमीवर विजापूर येथील प्रसिद्ध शिवगिरी मंदिरासह विविध मंदिरांमध्ये विशेष धार्मिक विधी, जपतप आणि अनुष्ठानांचे आयोजन करण्यात आले आहे.

हे चंद्रग्रहण उद्या दुपारी ३ वाजून २३ मिनिटांनी सुरू होईल आणि सायंकाळी ६ वाजून ४७ मिनिटांपर्यंत त्याचा काळ असेल. हे ग्रहण खग्रास असले तरी भारतात मात्र ते खंडग्रास स्वरूपात दिसणार आहे. विजापूरमध्ये चंद्रोदयानंतर केवळ १३ मिनिटे ग्रहणाचे दर्शन होण्याची शक्यता आहे. ग्रहण काळात शिवगिरी मंदिरात विशेष जप आणि ध्यानधारणा केली जाईल. ग्रहण सुटल्यानंतर मंदिराचे शुद्धीकरण करून विशेष पूजा आणि अभिषेक पार पडणार आहेत.

धार्मिक परंपरेनुसार, हे ग्रहण जरी अल्पवेळ दिसणार असले तरी भाविकांनी त्याचे वेध आणि शौच आचार पाळावेत, अशा सूचना मंदिर प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. मंगळवारी दुपारीच ग्रहणाचा स्पर्श होत असला, तरी सूर्यास्तानंतर पूर्व दिशेला काही काळ ग्रहणग्रस्त चंद्राचे दर्शन होईल. या काळात मंदिरातील दर्शनाच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले असून, शुद्धीकरणानंतरच भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे.

Tags: