Belagavi

काकतीत दुचाकी गॅरेजला आग : लाखोंचे नुकसान

Share

बेळगावजवळील काकती गावात एका गरीब तरुणाच्या गॅरेजला भीषण आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वेगाने विस्तारणाऱ्या काकती गावासाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र नसल्यानेच ही मोठी हानी झाल्याचा संताप सार्वजनिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

काकती गावातील महामार्गालगत असलेल्या विक्रम आनंदाचे यांच्या दुचाकी गॅरेजला अचानक आग लागली. या दुर्घटनेत सुमारे ६ ते ७ लाख रुपयांची मालमत्ता जळून खाक झाली आहे. विक्रम यांनी कर्ज काढून हे गॅरेज सुरू केले होते आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब याच व्यवसायावर अवलंबून होते. आगीची माहिती मिळताच समाजसेवक गजानन गव्हाणे यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. याप्रकरणी काकती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काकती गावातील या वर्षातील आगीची ही तिसरी घटना असून यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. औद्योगिक वसाहत आणि पंचतारांकित हॉटेलमुळे गावाचा विस्तार आणि लोकसंख्या वेगाने वाढत आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत शहरातून अग्निशमन बंब येईपर्यंत मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे काकती येथे तातडीने स्वतंत्र अग्निशमन केंद्र स्थापन करावे आणि पीडित तरुण कुटुंबाला सरकारने योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Tags: