बेळगावचे महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेली सर्वसाधारण सभा सत्ताधारी आणि विरोधी गटातील सदस्यांच्या वादामुळे प्रचंड गदारोळाची ठरली. अधिकारी माहिती देत नसल्याचा आरोप करत विरोधी सदस्यांनी सभागृहाच्या मध्यभागी येऊन निदर्शने केल्याने सभेत काही काळ तणाव निर्माण झाला होता.


सभेच्या सुरुवातीलाच विरोधी सदस्य शाहीद पठाण यांनी ठरावांसह इतर कोणतीही माहिती अधिकारी का देत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला. “अधिकारी कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत?” असा सवाल करत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. याला नगरसेवक रियाज किल्लेदार यांनीही पाठिंबा दिला. या मुद्द्यावरून विरोधी सदस्यांनी महापौरांच्या आसनासमोर जाऊन जोरदार घोषणाबाजी केली.

सत्ताधारी गटाचे नेते हनुमंत कोंगली यांनी यावर आक्षेप घेतला. माहिती तयार असून ती घेऊन जाण्याचे आधीच सांगितले होते, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला. यावरून हनुमंत कोंगली आणि शाहीद पठाण यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक उडाली. कोंगली यांनी विरोधी सदस्यांवर सभेचा वेळ वाया घालवत असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.

महापौर मंगेश पवार यांनी मध्यस्थी करत सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. विषयपत्रिकेवरील विषयांवर प्रथम चर्चा करावी आणि त्यानंतर इतर विषयांवर बोलून सहकार्य करावे, अशी सूचना महापौरांनी शाहीद पठाण यांना दिली. मात्र, या गदारोळामुळे सभेचे कामकाज काही काळ विस्कळीत झाले होते.


Recent Comments