धारवाड जिल्हा पंचायत सदस्य योगेशगौडा हत्या प्रकरणात अटकेत असलेले माजी मंत्री विनय कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या निकालानंतर धारवाडमध्ये त्यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.

धारवाडमधील विवेकानंद चौकात विनय कुलकर्णी समर्थकांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी समर्थकांनी सार्वजनिकरीत्या अल्पोपहाराचे वाटप करून आपला आनंद व्यक्त केला. साक्षीदारांना धमकावल्याच्या आरोपामुळे गेल्या आठ महिन्यांपासून त्यांचा जामीन रद्द झाला होता, परिणामी त्यांना कारागृहात जावे लागले होते.
उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कुलकर्णी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. शुक्रवारी या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. तसेच पुढील दोन महिन्यांत या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. अनेक दिवसांच्या तुरुंगवासानंतर नेत्याला जामीन मिळाल्याने समर्थकांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे.


Recent Comments