Belagavi

बेळगावात नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर पोलिसांची धडक कारवाई

Share

बेळगाव शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी आता कडक पाऊले उचलली आहेत. विशेषतः नंबर प्लेट नसलेल्या किंवा दोषपूर्ण नंबर प्लेट लावून फिरणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध पोलिसांनी धडक मोहीम राबवली आहे.

शहरभर चालवण्यात आलेल्या या विशेष कारवाईत शेकडो वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बेळगाव शहर पोलीस आयुक्त कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, शहर व्याप्तीमध्ये नंबर प्लेट नसलेल्या आणि नियबाह्य नंबर प्लेट बसवलेल्या वाहनांविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली. एकूण १२६ दुचाकी वाहनांवर मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १७७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईद्वारे केवळ एकाच दिवसात एकूण ६३ हजार रुपयांचा दंड घटनास्थळीच वसूल करण्यात आला आहे.

पोलिसांनी केवळ दंड आकारण्यापुरते मर्यादित न राहता, नियम मोडणाऱ्या वाहनांच्या नंबर प्लेट जागीच दुरुस्त करून घेत सार्वजनिकरीत्या इशारा दिला आहे. वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि आपल्या वाहनांना विहित नमुन्यातीलच नंबर प्लेट लावाव्यात, असे आवाहन पोलीस विभागाने जनतेला केले आहे. येणाऱ्या दिवसांतही अशी कारवाई सुरूच राहील, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Tags: