परमहंस योगानंदजींनी दिलेली वैज्ञानिक ध्यान धारणा आणि एकाग्रतेची पद्धत मानवी जीवनात शांतता निर्माण करण्यास पूरक आहे. योगदा सत्संग सोसायटीच्या माध्यमातून दाखवलेल्या मार्गावरून चालल्यास जीवनाचे सार्थक होईल, असे प्रतिपादन स्वामी श्रद्धानंदजी यांनी केले.

बेळगाव येथील सदाशिवनगर भागात योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडियाच्या नूतन ध्यान मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी आयोजित पालखी सोहळ्यात स्वामी श्रद्धानंदजी बोलत होते.
ईश्वराप्रती ओढ ही स्वतःमध्येच निर्माण करावी लागते, ती कोणीही बाहेरून देऊ शकत नाही. भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने समूह ध्यानात सहभागी होऊन आध्यात्मिक शक्ती वाढवावी, असे आवाहन स्वामी श्रद्धानंदजी यांनी केले. परमहंस योगानंदजींचा जन्म ५ जानेवारी १८९३ रोजी बंगालमधील एका प्रतिष्ठित कुटुंबात मुकुंदलाल घोष म्हणून झाला. बंगालच्या पावन भूमीने जगाला अनेक महान आध्यात्मिक आणि वैज्ञानिक विचारवंत दिले आहेत. योगानंदजींनी १९१७ मध्ये योगदा सत्संग सोसायटीची स्थापना करून जगाला आत्मसाक्षात्काराचा मार्ग दाखवला, अशी माहिती स्वामी श्रद्धानंदजी यांनी दिली.
सोहळ्याच्या प्रारंभी पहाटे ‘योगीची आत्मकथा’ या जगप्रसिद्ध ग्रंथाचे लेखक परमहंस योगानंदजी यांच्या प्रतिमेची फुलांनी सजवलेल्या पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी मंदिरासाठी सहकार्य करणारे चुनमरी दांपत्य आणि वैष्णवी रेसिडेन्सीचे बिल्डर वीरेश यांचा सत्कार करण्यात आला. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात क्रिययोग दीक्षा समारंभासह वायएसएस संन्याशांमार्फत ध्यान धारणेच्या विविध तंत्रांचे प्रशिक्षण भक्तांना दिले जाणार आहे.
या सोहळ्याला स्वामी धैर्यानंदजी, स्वामी श्रेयानंदजी यांच्यासह ध्यान केंद्राचे व्यवस्थापक शशिकांत चुनमरी, मंजुळा चुनमरी आणि मोठ्या संख्येने देणगीदार व भक्त उपस्थित होते.


Recent Comments