बेंगळुरूमध्ये सुमारे ५९३ कोटी रुपयांचे बनावट इन्व्हॉइस तयार करून सरकारची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या मोठ्या जाळ्याचा बेळगावच्या डीजीजीआय अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला आता कोठडी सुनावण्यात आली आहे.

बेळगाव विभागाच्या जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या (DGGI) अधिकाऱ्यांनी बेंगळुरूमध्ये धाडसी कारवाई करत ५९३ कोटी रुपयांचा बनावट इन्व्हॉइस घोटाळा उघडकीस आणला आहे. या रॅकेटचा मास्टरमाइंड आणि जीएसटी सल्लागार मोहम्मद सैफुल्ला याला अटक करण्यात आली आहे. सैफुल्ला याने ‘स्टार टॅक्स कन्सलटंट’ नावाने कार्यालय थाटून कोणत्याही वस्तू किंवा सेवांचा पुरवठा न करता केवळ कागदावर बनावट बिले तयार केली होती. या माध्यमातून सुमारे २३५ कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) अवैधपणे हस्तांतरित केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
संशयित आरोपीने शेकडो बनावट जीएसटी नोंदणी करून शेल कंपन्यांच्या नावाने ई-वे बिले तयार केली होती. प्रत्येक बिलावर ठराविक टक्के कमिशन घेऊन उद्योजकांना करचोरीसाठी मदत केल्याची कबुली मोहम्मद सैफुल्ला याने दिली आहे. २४ फेब्रुवारी रोजी बेंगळुरूमध्ये अटक केल्यानंतर त्याला बेळगावच्या न्यायालयात हजर करण्यात आले असून सध्या त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या मोठ्या जाळ्यात आणखी कोणाकोणाचा समावेश आहे आणि याचा लाभ घेणारे लाभार्थी कोण आहेत, याचा तपास अधिकाऱ्यांनी अधिक तीव्र केला आहे.


Recent Comments