Raybag

फायनान्स कंपनीचे हप्ते थकल्याने नवजात शिशुसह कुटुंबियांना काढले घराबाहेर

Share

फायनान्स कंपनीने राहते घर सील केल्यामुळे तीन महिन्यांच्या तान्हुल्या बाळासह पाच जणांचे कुटुंब रस्त्यावर येण्याची धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील अलखनूर गावात घडली आहे.

खाजगी फायनान्स कंपनीच्या या कारवाईमुळे पीडित कुटुंबाला कडाक्याच्या थंडीत रात्रभर घराबाहेर बसून राहावे लागले. घरामध्ये कपडे, अंथरूण आणि स्वयंपाकाचे साहित्य असूनही ते घेण्याची संधी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिली नसल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे.

पीडित बाळंतीण महिला श्रीदेवी पाटील यांनी वारंवार विनवणी करूनही फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. हनुमंत पाटील यांनी आपले वडील श्रीकांत पाटील यांच्या हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी घर गहाण ठेवून सुमारे २० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. गेल्या वर्षी वडिलांचे निधन झाले आणि त्यानंतर स्वतः हनुमंत पाटील यांनाही प्रकृतीच्या समस्या जाणवू लागल्यामुळे गेल्या सात महिन्यांपासून कर्जाचे हप्ते भरता आले नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

सुमारे सात लाख रुपयांची थकबाकी असल्याच्या कारणावरून कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अचानक येऊन घर सील केले. हप्ते भरण्यासाठी काही वेळ मागूनही कर्मचाऱ्यांनी दाद दिली नाही, असा आरोप कुटुंबाने केला आहे. तान्हुल्या बाळासह आणि मुलांसह सध्या घराबाहेर असलेल्या हनुमंत पाटील यांनी पैसे भरण्यासाठी मुदत देण्याची मागणी केली आहे. ही घटना हारूगेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, खाजगी फायनान्स कंपनीच्या या अमानवीय भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

Tags: