Chikkodi

चिकोडी: ऐन परीक्षेच्या काळात वीजपुरवठा खंडित

Share

चिकोडी तालुक्यातील उमराणी गावातील तोटपट्टी परिसरात वीजपुरवठा विस्कळीत झाला असून, तो सुरळीत करण्याच्या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी हेस्कॉम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रभा बंडगर यांना निवेदन सादर केले.

हेस्कॉम कार्यालयात पोहोचलेल्या ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांकडे आपली व्यथा मांडली. उमराणी गावातील हळजोळी कोडी, रामलिंग कोडी, सिदगौडा मळा, सनदी मळा आणि इतर भागात रात्री १० ते पहाटे २ वाजेपर्यंत वीज नसते. सध्या बारावी आणि दहावीच्या परीक्षा सुरू असून, रात्रीच्या वेळी वीज नसल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित करू नये, अशी मागणी वकील प्रशांत हुक्केरी यांनी केली.

यानंतर स्थानिक रहिवासी गजानन दानन्नवर आणि पार्वती ढवळेश्वर यांनी प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला. सध्या परीक्षांचे दिवस असताना विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेशी वीज दिली जात नाही, मग मुलांनी परीक्षा कशा द्याव्यात असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या भागात अद्याप ‘निरंतर ज्योती’ योजनेचा लाभ मिळालेला नाही, त्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हेस्कॉमने आमच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अन्यथा तोटपट्टीतील सर्व नागरिकांना एकत्र करून उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

याप्रसंगी गजानन दानन्नवर, पार्वती ढवळेश्वर, बाळेश कुटोळे, पिंटू रामनकट्टी, महांतेश दोडमणी, संदीप नरट्टी, रामचंद्र शागुंद्रे, बसवराज कागले, लक्ष्मण रामनकट्टी यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: