बेळगावच्या न्यू गांधी नगर परिसरात आज एका लहान मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून स्थानिकांनी एका बुरखाधारी महिलेला पकडून पोलिसांच्या हवाली केले. यावेळी पोलिस आणि संतप्त जमावामध्ये मोठी धक्काबुक्की झाल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

न्यू गांधी नगरमध्ये एक बुरखाधारी महिला संशयास्पदरीत्या वावरत होती. या महिलेने एका मुलाला पकडून पिशवीत भरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी तिला पकडले आणि बेदम चोप दिला. त्यानंतर तिला पोलिस चौकीत नेऊन अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले. मुलांच्या अपहरणाच्या अफवेमुळे नागरिक मोठ्या संख्येने पोलिस चौकीबाहेर जमा झाले आणि संशयित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
नगरसेवक अझीम पटवेगार यांनी सांगितले की, संशयित महिलेने मुलाला ओढून नेण्याचा प्रयत्न करताना लोकांनी पाहिले आणि तातडीने तिला पकडून पोलिसांच्या हवाली केले. यावेळी माळ मारुती पोलिस ठाण्याचे सीपीआय बी. आर. गडडेकर घटनास्थळी दाखल झाले. महिलेला ताब्यात घेताना जमाव आक्रमक झाल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला, ज्यामध्ये एक व्यक्ती जखमी झाली आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा विविध कोनांतून तपास केला असता, ती महिला मुलांचे अपहरण करणारी नसून केवळ एक भिक्षुकी असल्याचे निष्पन्न झाले आहे. व्हॉट्सॲपवर व्हायरल झालेल्या चुकीच्या संदेशामुळे हा संपूर्ण गोंधळ निर्माण झाला होता. नागरिकांनी सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केले आहे.
सीपीआय बी. आर. गडडेकर यांनी स्पष्ट केले की, सध्या सोशल मीडियावर अपहरणाचे अनेक खोटे मेसेज व्हायरल होत आहेत. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. संबंधित संशयित महिलेला ताब्यात घेण्यात आले असून, सखोल चौकशीनंतरच या प्रकरणातील सत्य समोर येईल. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


Recent Comments