Belagavi

बेळगावात चाकू हल्लेखोरांच्या बंदोबस्तासाठी पोलिसांचा ‘मास्टर प्लॅन’

Share

बेळगाव शहरात चाकू हल्ल्याच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून चाकू-सुऱ्यांसारखी घातक शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी विशेष मोहीम सुरू केली आहे.

बेळगाव शहरात गेल्या काही महिन्यांपासून चाकू हल्ल्याच्या घटनांचे सत्र सुरू असून, या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलीस आयुक्त भूषण बोरासे यांनी ‘अँटी स्टॅबिंग स्क्वॉड’ स्थापन करून कडक आदेश दिले आहेत. गेल्या जून महिन्यापासून आतापर्यंत शहरात चाकू हल्ल्याचे ४१ गुन्हे दाखल झाले असून, ६० हून अधिक जणांवर आर्म्स अ‍ॅक्टनुसार कारवाई करण्यात आली आहे. विशेषतः मार्केट आणि खडेबाजार या व्यापारी भागात अशा घटना अधिक घडत असल्याने पोलिसांनी रात्रंदिवस गस्त आणि वाहन तपासणी तीव्र केली आहे. सार्वजनिक ठिकाणी तलवार किंवा पिस्तूल बाळगून दहशत निर्माण करणाऱ्यांना अटक करण्यात आली असून, अशा गुंडांविरुद्ध तातडीने रौडीशीड उघडणार असल्याचा इशारा भूषण बोरासे यांनी दिला आहे.

शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बॅगेत चाकू-सुऱ्यांसारखी घातक शस्त्रे सापडत असल्याने पोलीस यंत्रणा थक्क झाली आहे. क्षुल्लक कारणावरून होणाऱ्या वादात तरुण मुले आवेषात येऊन एकमेकांवर चाकूने वार करत आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी महाविद्यालयीन परिसर आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांकडून दररोज आकस्मिक तपासणी केली जात आहे. नुकतेच माळमारुती पोलिसांनी पिस्तूल आणि शस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांना पकडून मोठा अनर्थ टाळला आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस सतर्क असून शस्त्र संस्कृती जोपासणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. पालकांनीही आपल्या मुलांच्या वागणुकीवर लक्ष ठेवावे, असे आवाहन भूषण बोरासे यांनी केले आहे.

Tags: