State

हमी योजना कधीही बंद होणार नाहीत; गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांचे स्पष्टीकरण

Share

राज्यातील काँग्रेस सरकारच्या पाच गॅरंटी योजना अत्यंत यशस्वी ठरल्या असून, त्या कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाहीत, असे प्रतिपादन गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी केले. विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या अपप्रचाराला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, या योजनांमुळे कोट्यवधी रुपये थेट गरिबांच्या हाती जात असून लोकांचा आर्थिक स्तर उंचावत आहे.

तुमकुरू येथे आयोजित गॅरंटी योजना अंमलबजावणी समितीच्या भव्य कार्यशाळेत डॉ. जी. परमेश्वर बोलत होते. या कार्यशाळेला ५ हजारांहून अधिक लाभार्थी उपस्थित राहणे हीच या योजनांच्या यशाची पावती असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार विनय कुलकर्णी यांना मिळालेल्या दिलासादायक निर्णयावर भाष्य करताना, कायद्याच्या चौकटीत होणाऱ्या निर्णयांचे स्वागत असल्याचे डॉ. जी. परमेश्वर यांनी स्पष्ट केले.

राज्यातील कंत्राटदारांच्या थकीत बिलांबाबत बोलताना त्यांनी मागील सरकारवर निशाणा साधला. मागील सरकारने सुमारे १.४० लाख कोटी रुपयांची बिले थकवून ठेवली होती. आमचे सरकार टप्प्याटप्प्याने हा निधी वितरित करत असून लवकरच सर्व कंत्राटदारांची देणी पूर्ण केली जातील. कंत्राटदारांनी कर्ज काढून कामे केली आहेत, त्यामुळे त्यांच्या अडचणींची सरकारला पूर्ण जाणीव आहे, अशी ग्वाही डॉ. जी. परमेश्वर यांनी दिली.

उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या गटातील आमदारांच्या बैठकीबाबत विचारले असता, तो केवळ वाढदिवसाचा सोहळा होता, त्यात कोणताही राजकीय विशेष अर्थ नसल्याचे डॉ. जी. परमेश्वर यांनी सांगितले. तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीतून मी नाराज होऊन बाहेर पडलो, ही चर्चा निव्वळ अफवा असून यात कोणतेही तथ्य नसल्याचे डॉ. जी. परमेश्वर यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणुकीबाबत आमदार बाळकृष्ण यांनी व्यक्त केलेले मत त्यांचे वैयक्तिक असू शकते, मात्र अंतिम निर्णय जनताच घेईल, असेही डॉ. जी. परमेश्वर यांनी नमूद केले.

Tags: