अमली पदार्थमुक्त भारत घडवण्यासाठी आणि अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विजापूरमध्ये भव्य वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात शेकडो विद्यार्थ्यांनी सहभागी होत व्यसनमुक्तीचा निर्धार व्यक्त केला.


राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली विजापूरमधील विविध नर्सिंग महाविद्यालयांच्या सहकार्याने ही जनजागृती वॉकथॉन पार पडली. जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी या रॅलीला हिरवा कंदील दाखवून प्रारंभ केला. शहरातील श्री सिद्धेश्वर मंदिरापासून सुरू झालेली ही वॉकथॉन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर संपन्न झाली. यामध्ये विजापूर शहरातील सर्व नर्सिंग महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

तरुणांनी अमली पदार्थांपासून दूर राहावे आणि निरोगी समाजासाठी अवयवदानाची प्रतिज्ञा करावी, असे आवाहन लक्ष्मण निंबरगी यांनी केले.

‘ड्रग फ्री इंडिया’ आणि ‘अवयवदान हेच महादान’ अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम आणि अवयवदानामुळे वाचणारे प्राण, यावर या रॅलीत भर देण्यात आला. सुमारे १५०० हून अधिक नर्सिंग विद्यार्थ्यांनी पदयात्रेतून समाजाला मोलाचा संदेश दिला, ज्याचे नागरिकांनीही कौतुक केले. एक सुदृढ आणि जबाबदार समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने ही वॉकथॉन यशस्वीरित्या पार पडली.
आरोग्यपूर्ण समाज निर्मितीसाठी तरुणांनी पुढे येण्याची गरज असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले.


Recent Comments