State

आमदार विनय कुलकर्णी यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा

Share

धारवाडमधील भाजप नेते योगेश गौडा हत्या प्रकरणात अटकेत असलेले आमदार विनय कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असून, त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

धारवाड जिल्हा पंचायत सदस्य योगेश गौडा यांच्या हत्या प्रकरणात सीबीआयने विनय कुलकर्णी यांना अटक केली होती. साक्षीदारांवर दबाव टाकल्याच्या आरोपावरून यापूर्वी कनिष्ठ न्यायालय आणि हायकोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. या निर्णयाला कुलकर्णी यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करत कुलकर्णी यांना जामीन मंजूर करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. सीबीआयने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले असून, दीर्घ काळानंतर आमदारांना या कायदेशीर लढाईत मोठे यश मिळाले आहे.

१५ जून २०१६ रोजी धारवाडमधील एका जिममध्ये योगेश गौडा यांची हत्या करण्यात आली होती. तत्कालीन काँग्रेस सरकारने या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवला होता, मात्र राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. या हत्येमागे विनय कुलकर्णी यांचा हात असल्याचा आरोप योगेश गौडा यांच्या कुटुंबीयांनी पहिल्यापासून केला होता. आता सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्याचे वृत्त समजताच धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत जल्लोष केला. सध्या परप्पना अग्रहारा तुरुंगात असलेले विनय कुलकर्णी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाहेर येतील.

Tags: