बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमत आज आशा कार्यकर्त्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी तीव्र निदर्शने केली.

मागील आंदोलनावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी १० हजार रुपये मानधन देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर सुमारे २० बैठका होऊनही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. रात्रंदिवस सेवा बजावूनही सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. ६ मार्चपर्यंत मानधन वाढीसह इतर मागण्या मान्य न झाल्यास पदयात्रेने बेंगळुरूला जाऊन आंदोलन करण्याचा इशारा आशा कार्यकर्त्या संघटनेच्या बेळगाव जिल्हा उपाध्यक्षा रूपा अंगडी यांनी दिला.
२०२४-२५ मध्ये फ्रीडम पार्क येथे अहोरात्र आंदोलन करण्यात आले होते, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र, अजूनही मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. सरकारने तातडीने मानधन वाढवावे आणि ७ हजार आशा कार्यकर्त्यांना सेवेतून कमी करण्याचा निर्णय रद्द करावा. जाहीरनाम्यात आश्वासन दिल्याप्रमाणे ८ हजार रुपयांची वाढ करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे सुजाता काडमठ यांनी म्हटले.
या आंदोलनात बेळगाव जिल्ह्यातील विविध भागांतील आशा कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.


Recent Comments