खानापूर शहराच्या शिवस्मारक चौकात आज पहाटेच नगरपंचायत प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरणारी बांधकामे कोणत्याही दबावाला बळी न पडता हटवण्यास सुरुवात झाली आहे.

खानापूर शहराच्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमित दुकाने नगरपंचायतीने जेसीबीच्या साहाय्याने हटवली आहेत. या अतिक्रमणामुळे रस्ते रुंदीकरणाचे काम रखडले होते. या प्रश्नासाठी शहरातील दोन पत्रकार आणि माजी नगरपंचायत सदस्यांनी उपोषण केले होते, ज्याला जनतेने मोठा पाठिंबा दिला होता. या आंदोलनानंतर सर्वेक्षण आणि मार्किंग पूर्ण होताच ही कारवाई करण्यात आली आहे.
अतिक्रमण काढू नये म्हणून प्रभावशाली व्यक्तींकडून मोठा दबाव आला होता, तरीही अधिकारी कोणाचीही तमा न बाळगता आपल्या कर्मचाऱ्यांसह कामाला लागले आहेत. शिवस्मारक चौकातून सुरू झालेल्या या मोहिमेसाठी खानापूर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेतली आहे. सार्वजनिक हितासाठी सुरू असलेल्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असून रस्ता रुंदीकरणाचे काम लवकर पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Recent Comments