Belagavi

बेळगावात डॉ. बाबासाहेबांच्या विचारधारेवर राष्ट्रीय संमेलन

Share

बेळगाव मधील राणी चन्नम्मा विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रज्ञा आणि वैचारिकतेवर आधारित दोन दिवसीय राष्ट्रीय संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. समाजकल्याण विभाग आणि विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात देशातील दिग्गज विचारवंतांनी आंबेडकरी विचारधारेची प्रासंगिकता अधोरेखित केली.

बेळगावच्या नेहरू नगरमधील डॉ. बी. एस. जिरगे सभागृहात “प्रज्ञा, वैचारिकतेचा आणि प्रजासत्ताक: डॉ. बी. आर. आंबेडकर” या विषयावर राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. गदग येथील महात्मा गांधी पंचायत राज आणि ग्रामीण विकास विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. डी. जीवन कुमार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी उद्घाटनपर भाषणात आंबेडकरांची विचारधारा ही भारतीय लोकशाहीचा खरा आधारस्तंभ असल्याचे डॉ. डी. जीवन कुमार यांनी नमूद केले..

कुवेम्पू विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक डॉ. रवींद्र गडकर यांनी सत्राचे अध्यक्षपद भूषवले, तर समाजकल्याण विभागाचे संचालक डॉ. सबीर अहमद मुल्ला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक पैलू आजच्या प्रजासत्ताक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी मांडले.

नवी दिल्ली येथील प्रसिद्ध राज्यशास्त्रज्ञ प्रा. राजीव भार्गव यांनी संमेलनाचे प्रास्ताविक केले. आंबेडकरांच्या तात्विक सिद्धांतांनी भारताच्या लोकशाहीची पायाभरणी कशी केली, याचे विश्लेषण त्यांनी मांडले. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय आणि समानता पोहोचवण्यासाठी अशा चर्चासत्रांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

राणी चन्नम्मा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू सी. एम. त्यागराज यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक क्रांतीवर आणि त्यांच्या जीवन आदर्शांवर सविस्तर भाष्य केले. आंबेडकरी तत्वज्ञान हे मानवी हक्क आणि सामाजिक न्यायाचा जागतिक वारसा असल्याचे सी. एम. त्यागराज यांनी सांगितले.

संमेलनाच्या पहिल्या दिवशी “डॉ. बी. आर. आंबेडकर: विचार, अस्मिता आणि भारताचे भविष्य” या विषयावर तज्ज्ञांमध्ये सखोल चर्चा झाली. या वैचारिक संमेलनासाठी विद्यापीठाचे विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: