Hukkeri

हुक्केरीमध्ये शांतता समितीच्या बैठकीत सलोख्याचे आवाहन

Share

होळी आणि रमजान हे सण सर्वांनी एकोप्याने आणि शांततेत साजरे करावेत, असे आवाहन हुक्केरीचे पोलीस निरीक्षक महांतेश बस्सापूरे यांनी हुक्केरी येथे आयोजित शांतता बैठकीत केले आहे.

हुक्केरी पोलीस ठाण्यात आयोजित या शांतता बैठकीत हिंदू आणि मुस्लिम समाजातील प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी कन्नड जानपद परिषदेचे अध्यक्ष सुभाष नाईक यांनी मार्गदर्शन केले. हुक्केरी शहरात ३ मार्च रोजी होळी पौर्णिमा आणि ४ मार्च रोजी रंगपंचमी साजरी केली जाणार आहे. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हे दोन्ही सण शांततेत साजरे करून शहराची परंपरा जपूया, असे आवाहन सुभाष नाईक यांनी केले.

व्यासपीठावर गुरुराज कुलकर्णी, राजू मुन्नोळी, रमेश बोरगांवी, महांतेश तळवार, इर्शाद मोकाशी, सलुम कळवंत, भीमानंद मुदकन्नवर, रेखा चिक्कोडी आणि कुमार जुटाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

रंगपंचमीच्या दिवशी सर्व समाजातील तरुणांनी आनंदाने रंगोत्सव साजरा करावा. मात्र, कोणावरही जबरदस्तीने रंग टाकू नये, तसेच शक्यतो कोरड्या रंगांचा किंवा नैसर्गिक रंगांचा वापर करावा, असे आवाहन विद्युत सहकारी संघाचे अध्यक्ष महावीर निलजगी यांनी केले.

हुक्केरीच्या जनतेने होळी, रमजान आणि ग्रामदेवतेची जत्रा सलोख्याने साजरी करावी. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे पोलीस निरीक्षक महांतेश बसपूरे यांनी म्हटले.

या बैठकीला हुक्केरी शहरातील विविध संस्थांचे प्रतिनिधी, हिंदू-मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: