तालुक्याचे केंद्र असलेल्या खानापूर शहरातील मुख्य रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रेंगाळल्याने आज व्यापारी आणि नागरिकांनी पक्षभेद विसरून कडकडीत बंद पाळला.


गोवा क्रॉस ते जांबोटी क्रॉसपर्यंतच्या रस्त्याचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू असल्याने शहराचा संपर्क तुटला असून, त्याचा थेट फटका व्यापाराला बसत आहे. या संतापजनक परिस्थितीमुळे आज संपूर्ण शहर बंद ठेवून तहसील कार्यालयावर धडक देण्यात आली.
खानापूर शहरातील मुख्य बाजारपेठ आणि शासकीय कार्यालयांकडे येणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली असून पर्यायी मार्गाची व्यवस्था नसल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरात येण्यासाठी लांबचा वळसा घालावा लागत असल्याने ग्राहकांनी पाठ फिरवली आहे, परिणामी व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर आज सर्व दुकानदारांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून प्रशासनाचे लक्ष वेधले.
आंदोलकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा नेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दुंडाप्पा कोमार यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याचे काम नेमके कधी पूर्ण होणार, याची लेखी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. वारंवार तक्रारी करूनही रस्तेकामात प्रगती होत नसल्याने, एका साध्या रस्त्यासाठी किती महिने वाट पाहायची, असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.


Recent Comments