बागलकोटमध्ये शिवजयंती मिरवणुकीवर झालेल्या दगडफेक प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. या घटनेचा निषेध म्हणून आज हिंदू संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली असून, माजी मंत्री श्रीरामुलू यांनी या प्रकरणाच्या एनआयए चौकशीची मागणी केली आहे.


नवनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदू हितरक्षण समितीच्या नेतृत्वाखाली मोठे धरणे आंदोलन सुरू आहे. शिवजयंती मिरवणुकीवर झालेली दगडफेक आणि चपला फेकण्याच्या घटनेचा निषेध करत कार्यकर्त्यांनी दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. या आंदोलनात खासदार गद्दिगौडर, राज्यसभा सदस्य नारायणसा भांडगे आणि अरविंद बेल्लद यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले आहेत. सध्या जुन्या बागलकोटमध्ये कलम १६३ अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली असून पाच पोलीस अधीक्षकांच्या देखरेखीखाली मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दुसरीकडे, माजी मंत्री श्रीरामुलू यांनी या प्रकरणाची एनआयए (NIA) मार्फत चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. राज्यातील हिंदूंच्या मिरवणुकांवर होणाऱ्या सलग हल्ल्यांमागे नियोजित कट असण्याची शक्यता त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे. डीजे हळ्ळी आणि बागलकोट या दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी श्रीरामुलू यांनी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सध्या आंदोलकांकडून घोषणाबाजी सुरू असून परिस्थिती तणावपूर्ण शांततेची आहे.


Recent Comments