हुबळी येथे पार पडलेल्या नैऋत्य रेल्वेच्या महत्त्वपूर्ण बैठकीत उत्तर कर्नाटकच्या रेल्वे प्रश्नांवरून जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. नवीन रेल्वे मार्ग आणि रेल्वे गाड्यांच्या विस्ताराची मागणी करत असताना रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या बेजबाबदार उत्तरामुळे खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.


हुबळी येथील चालुक्य रेल्वे इन्स्टिट्यूटच्या सभागृहात मंगळवारी नैऋत्य रेल्वेच्या २५ व्या विभागीय रेल्वे वापरकर्ता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राज्य रेल्वे विकास संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष कुतबुद्दीन काजी यांनी सहभाग घेऊन उत्तर कर्नाटकच्या विविध रेल्वे मागण्यांबाबत आणि नवीन मार्गांबाबत महाव्यवस्थापक पी. अनंत यांना निवेदन दिले.

लोकापूर ते रामदुर्ग-सवदत्ती मार्गे धारवाडपर्यंत नवीन रेल्वे मार्ग तातडीने कार्यान्वित करावा, बसव एक्स्प्रेसचा विस्तार लोकापूरपर्यंत करावा, विजापूर-बागलकोट मार्गे तिरुपतीसाठी नवीन रेल्वे सुरू करावी, तसेच विजापूर ते बागलकोट, गदग, होसपेट, बळ्ळारी मार्गे गुंटकलपर्यंत नवीन पॅसेंजर गाडी सुरू करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त हुबळी-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस, म्हैसूर-साईनगर शिर्डी आणि यशवंतपूर-बिकानेर या गाड्या दररोज चालवाव्यात, रायचूर-विजापूर आणि हैदराबाद-विजापूर या रेल्वे गाड्यांचा विस्तार गदगपर्यंत करावा आणि मुंबई-बेंगळुरू सुपरफास्ट एक्सप्रेस विजापूर-बागलकोट मार्गे वळवावी, अशा मागण्या मांडण्यात आल्या आहेत.
बागलकोट-कुडची रेल्वे मार्गाचे काम लोकापूरपर्यंत पूर्ण झाले असून सुरक्षा सर्वेक्षणही पार पडले आहे. मात्र, रेल्वे सुरू नसल्याने स्थानकांची दुरवस्था होत असल्याकडे कुतबुद्दीन काजी यांनी लक्ष वेधले. बागलकोट-लोकापूर दरम्यान पॅसेंजर गाडी सुरू करण्याची मागणी केली असता, “तेथील लोक रेल्वेत बसणार नाहीत,” असे उडवाउडवीचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. यावर खासदार प्रियांका जारकीहोळी संतापल्या आणि “तुम्ही अद्याप त्या भागात रेल्वे सुरूच केलेली नाही, मग लोक बसणार नाहीत हे कशाच्या आधारावर सांगता?” अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
यावेळी राज्य रेल्वे विकास संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष कुतबुद्दीन काजी, महेंद्र सिंघवी, सुभाष शिरबूर, राजशेखर मेणशिनाकाई, बाबाजान मुधोळ, मैनुद्दीन खाजी, एम. के. यदवाड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments