Belagavi

बेळगावच्या बाजारपेठेत धुळीचे साम्राज्य; एल अँड टी कंपनीच्या संथ कारभाराचा फटका

Share

बेळगावमधील मुख्य बाजारपेठेत पाइपलाइनचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे व्यापारी आणि नागरिक हैराण झाले असून, संतप्त व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.

बेळगावमधील मुख्य बाजारपेठ असलेल्या खडे बाजार, समादेवी गल्ली आणि रामदेव गल्ली भागात गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या पाइपलाइनच्या कामामुळे नागरिक आणि व्यापारी त्रस्त झाले आहेत. एल अँड टी कंपनीकडून सुरू असलेल्या या कामाचा वेग अत्यंत संथ असल्याने संपूर्ण परिसरात धुळीचे लोट उसळत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात २४ तास पाणीपुरवठ्यासाठी खोदलेले रस्ते तसेच अर्धवट स्थितीत सोडल्याने संपूर्ण बाजारपेठ धुळीने माखली आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे ही धूळ थेट दुकानांमध्ये शिरत असून ग्राहकांनी पाठ फिरवल्याने व्यवसायाचे मोठे नुकसान होत आहे. अरुंद रस्त्यांवर सुरू असलेल्या या कामामुळे दररोज वाहतूक कोंडी होत असून, यातून वाहनधारकांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.

या समस्येबाबत स्थानिक आमदारांना निवेदन देऊनही केवळ एक दिवस काम वेगाने झाले आणि पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. वेळेवर कर भरूनही महापालिकेकडून अशा त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.

लवकर काम पूर्ण करून धुळीच्या समस्येतून सुटका न झाल्यास संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा खडे बाजार मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील नाईक यांनी दिला आहे. धुळीमुळे व्यापाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनत असून, महापालिका आणि कंत्राटदार कंपनीने तातडीने पावले न उचलल्यास तीव्र आंदोलनाचा पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतला आहे.

Tags: