मार्च महिन्यात येणारे होळी पौर्णिमा आणि रमजान हे सण शांततेत पार पडण्यासाठी धारवाड जिल्हा पोलीस अधीक्षक गुंजन आर्य यांनी दोन्ही समुदायातील प्रमुख नेते आणि धर्मगुरूंची बैठक घेऊन आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.


धारवाड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत दोन्ही धर्माचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत पोलीस अधीक्षकांनी नेत्यांच्या सूचना ऐकून घेतल्या आणि सण साजरे करताना सामाजिक सलोखा जपण्याचे आवाहन केले.
सध्या सणासुदीच्या काळात सामाजिक शांतता बिघडवणाऱ्या प्रवृत्ती सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे, मात्र धारवाड जिल्ह्यात अशा घटनांना थारा दिला जाणार नाही. येथील नागरिक नेहमीच गुण्यागोविंदाने सण साजरे करतात आणि यावेळीही त्यांनी राज्यासमोर एक आदर्श ठेवावा, असे आवाहन गुंजन आर्य यांनी केले.
कोठेही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता वाटल्यास किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले. गोपनीय माहिती देणाऱ्यांची नावे गुप्त ठेवली जातील आणि कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.


Recent Comments