अत्यंत कठीण अशा आंतरराष्ट्रीय ‘आयर्न मॅन’ स्पर्धेत बेळगावचे आरएसआय संगमेश आनी यांनी यश मिळवल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. पोलीस कर्तव्याचा व्याप सांभाळून त्यांनी केलेल्या या अष्टपैलू कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

श्रीलंकेतील कोलंबो येथे पार पडलेल्या मानाच्या ‘आंतरराष्ट्रीय आयर्न मॅन ७०.३’ स्पर्धेत बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाच्या सीएआर विभागातील आरएसआय संगमेश एस. आनी यांनी अतुलनीय कामगिरी केली आहे. २२ फेब्रुवारी रोजी झालेल्या मुसळधार पावसाचे आव्हान पेलत त्यांनी ९० किमी सायकलिंग २ तास ५१ मिनिटांत, तर २१ किमी धावण्याचे अंतर २ तास ०५ मिनिटांत पूर्ण केले. एकूण ५ तास ०९ मिनिटांत हे उद्दिष्ट गाठत त्यांनी आपली शारीरिक आणि मानसिक क्षमता सिद्ध केली आहे.
या असामान्य यशाबद्दल संगमेश आनी यांचा बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला. यावेळी उपायुक्त नारायण बरमणी, निरंजन राजे अरस आणि पोलीस दलातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. संगमेश आनी यांची ही कामगिरी शिस्त आणि क्रीडा कौशल्याचा उत्तम नमुना असून यामुळे पोलीस दलाची मान उंचावली असल्याची प्रतिक्रिया भूषण बोरसे यांनी व्यक्त केली. खाकी वर्दीत राहून आंतरराष्ट्रीय स्तरावर बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या आनी यांच्या या यशाचा राज्य पोलीस दलाला अभिमान असल्याचे भूषण बोरसे यांनी म्हटले.


Recent Comments