खानापूर तालुक्यातील कालमणी गावात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरी केली असून, पुरावा नष्ट करण्यासाठी सीसीटीव्हीचा डीव्हीआरही पळवून नेला आहे. पत्रकार आणि मुख्याध्यापक सुनील चिगुळकर यांच्या घरात ही घटना घडली आहे.


कालमणी-आमटे रस्त्यावरील सुनील चिगुळकर यांचे घर मुलांच्या शिक्षणानिमित्त गेल्या काही महिन्यांपासून बंद होते. गावातील शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सर्व गावकरी व्यग्र असल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचे मुख्य कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील तीन खोल्यांचे कपाट फोडून सुमारे २० हजार रुपयांची रोकड आणि सुरक्षेसाठी बसवलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआर चोरट्यांनी लंपास केला. मध्यरात्री मोबाईलवरील सीसीटीव्ही संपर्क तुटल्याचे लक्षात आल्यावर मालकांनी पुतण्याला पाहणी करण्यास सांगितले असता हा प्रकार उघडकीस आला, अशी माहिती सुनील चिगुळकर यांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलीस आणि जांबोटी आउटपोस्टच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. बेळगाव येथून पाचारण करण्यात आलेल्या श्वाणपथकाने कालमणी-आमटे रस्त्यापर्यंत माग काढला, मात्र तिथेच मार्ग खुंटला. चोरट्यांनी चेहऱ्यावर मास्क आणि हातांत ग्लोव्हज घातल्याने ही सराईत टोळी असण्याची शक्यता खानापूर पोलिसांनी व्यक्त केली आहे. सध्या खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जाळे विणले आहे.


Recent Comments