रंगांचा सण असलेल्या होळीसाठी बेळगाव शहर सज्ज झाले असून बाजारपेठेत सणाचे वातावरण आहे. शहरातील प्रमुख व्यापारी मार्गांवर विविध प्रकारचे रंग आणि आकर्षक पिचकाऱ्या दाखल झाल्या असून, नागरिक आवश्यक साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी करत आहेत.


येत्या ४ मार्च रोजी साजरा होणाऱ्या होळीच्या पार्श्वभूमीवर बेळगावच्या बाजारपेठेत मोठी लगबग पाहायला मिळत आहे. शहरातील पांगुळ गल्ली, गणपत गल्ली आणि मारुती गल्ली या प्रमुख व्यापारी पेठांमध्ये आर्थिक उलाढाल वाढली आहे. यंदा बाजारपेठेत ३०० हून अधिक प्रकारची वैविध्यपूर्ण उत्पादने उपलब्ध असून, ग्राहक आवडीनुसार साहित्याची निवड करत आहेत. यावर्षी बाजारपेठेत नावीन्यपूर्ण वस्तूंना पसंती मिळत असून ग्राहकांच्या मागणीनुसार सर्व साहित्य उपलब्ध असल्याची माहिती चिराग शाह यांनी दिली.

बाजारपेठेत बाराहून अधिक प्रकारचे रंग उपलब्ध असून, त्वचेसाठी सुरक्षित असणाऱ्या हर्बल आणि स्मोक कलर्सना विशेष मागणी आहे. यासह स्प्रे कलर्स आणि पारंपरिक खडी पावडरचीही विक्री होत आहे. लहान मुलांसाठी विविध मुखवटे, अत्याधुनिक इलेक्ट्रिक गन आणि पिचकाऱ्या लक्ष वेधून घेत आहेत. यंदा बाजारपेठेत अपेक्षित व्यापार होत असल्याची प्रतिक्रिया चिराग शाह यांनी व्यक्त केली. मिरवणुकीसाठी लागणाऱ्या डफली आणि ताशा यांसारख्या पारंपरिक वाद्यांनाही मागणी असून, ४० ते ३०० रुपयांपर्यंतच्या दरात ही उत्पादने उपलब्ध आहेत.

एकूणच बेळगावची बाजारपेठ सध्या रंगांच्या विविध छटांनी बहरली असून, होळी साजरी करण्यासाठी सर्वच स्तरांतील नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.


Recent Comments