protest

तल्लूर गावात दारूच्या दुकानाविरोधात महिलांचा एल्गार

Share

बेळगाव जिल्ह्यातील यरगट्टी तालुक्यातील तल्लूर गावात आज दारूच्या दुकानाविरोधात महिलांनी रणशिंग फुंकले आहे. गावातील वाईन शॉपमुळे जनजीवन विस्कळीत होत असून ते त्वरित बंद करावे, या मागणीसाठी शेकडो महिला आणि शाळकरी मुलांनी मोर्चा काढला.

यरगट्टी तालुक्यातील तल्लूर गावातील ‘वीरेश वाईन शॉप’ समोर आज महिलांनी तीव्र निदर्शने करत दारूचे दुकान हटवण्याची मागणी केली. मद्यविक्री केंद्राच्या परिसरात शाळकरी मुले आणि महिलांना वावरणे कठीण झाले असून तिथे अत्यंत वाईट वातावरण निर्माण झाले असल्याचा संताप आंदोलकांनी व्यक्त केला. दिवसभर कष्ट करून कमावलेला सर्व पैसा पुरुष दारूमध्ये उडवत असून गावातील तरुण आणि वृद्ध व्यसनाधीनतेमुळे मृत्यूमुखी पडत आहेत. यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडून रस्त्यावर आली आहेत, अशी व्यथा आंदोलक महिलांनी मांडली.

यावेळी बोलताना, मद्याच्या व्यसनामुळे अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत, अशी भावना महिलांनी व्यक्त केली. लग्न होऊन काही दिवस झाले नाही तोच पतीच्या दारूच्या व्यसनामुळे सुनांना माहेरी जावे लागत असल्याच्या घटना गावात वाढल्याचे सांगताना महिलांना अश्रू अनावर झाले. जनजीवन विस्कळीत करणाऱ्या या मद्यविक्री केंद्राला कायमस्वरूपी टाळे लावावे, या मागणीचे निवेदन तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. जर दारूचे दुकान बंद झाले नाही, तर आगामी काळात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.

Tags: